Monday, 12 March 2018

बळीराजा

हे पोस्ट मराठीत लिहिण्याचे विशेष कारण म्हणजे जेव्हा आपल्याला कोणती गोष्ट मनापासुन सांगायची असते तेव्हा ती आपल्या मातृभाषेत सगळ्यात चांगली सांगता येते.


काल जवळ जवळ ५०००० शेतकरी नाशिकहून मुंबई ला दाखल झाले. त्यांना पाहून अक्षरशः अंगावर काटा आला. भारत हा अजूनही कृषिप्रधान देश आहे आणि बळीराजा म्हटला जाणारा शेतकरी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. ह्याच शेतकऱ्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढे काही करावे लागत असेल तर आपण अजून पुढारलेले नाही. गाडीत बसून, SPF 50 चं सनस्क्रीन आणि गॉगल लावून "बाहेर किती ऊन आहे" हे म्हणणं खुपच सोप्पं आहे. पण ह्याच उन्हात आपल्या बायका-पोरांना घेऊन, आपल्या गरजा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा ठेवून १८० किमी. पायपीट करत येणं खूपच कठीण आहे.

खरंतर त्यांच्या हिम्मतीला दाद द्यायला हवी. कर्जाबरोबर आपल्या दुःखाचेही ओझे घेऊन आले होते हे शेतकरी. पण स्वतःच्या विचारांवर मन ठाम असल्यामुळे त्यांना कसलीच भीती नव्हती. वृत्तपत्रात छापलेली काही चित्रे अगदी दयनीय आहेत. कोणाच्या पायातून रक्त येतंय तर कोणी सावली मिळायला साध्या पुठ्ठयाचा वापर करत आहे. अश्या परिस्थितीही शेतकऱ्यांनी दुसऱ्याचा विचार आधी केला. परीक्ष्यांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आपला मोर्चा सकाळी ऐवजी रात्रीच न्ह्यावा असे त्यांनी ठरवले. बऱ्याचश्या मागण्या पूर्ण झालेल्या असून, त्यांना काही आश्वासने हि दिली गेली आहेत. तरीही आमचा लढा चालूच राहील असे त्यांनी म्हटले आहे.

ह्याच बरोबर कौतुक करायला हवे तर ते आपल्या मुंबईकरांचे. हाकेला ओ देणारा मुंबईकर कालही आपल्या शेतकरी बंधूंसाठी धावून गेला. कोणी जेवण आणि पिण्याचे पाणी तर कोणी वडापाव आणि चहा देऊन मदत केली. पायाला झालेल्या जखमांना फुंकर मारण्यासाठी चपलाही वाटण्यात आल्या. काहींवर डॉक्टरांनीही प्रथम उपचार केले. विशेष कौतुक करायचे ते म्हणजे पोलिसांचे. ४८ तास ड्युटीवर असूनही न थकता आपले काम करत राहिले. मोर्च्याची जबाबदारी होतीच, पण त्याच बरोबर शहराचे दैनंदिन विस्कळीत होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी आपली कामगिरी चोख पार पाडली. रेल्वे आणि एसटीनेही विशेष गाड्या सोडल्या.

एकूणच काय तर माणूस असलेल्या ह्या जगात थोडी माणुसकीही शिल्लक आहे असे म्हणायला हरकत नाही.

मयुरा प्रभुदेसाई
मार्च १३, २०१८


No comments:

Post a Comment